रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असून, डॉक्टर अभावी ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या विषयात गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा संख्येने डॉक्टर या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी भाजपा दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सातत्याने येत असतात. दररोज २५० ते ३०० रुग्ण OPD विभागात येतात. ॲडमिट रुग्णांची संख्या १५० च्या पुढे सातत्याने असते.
मात्र गेली काही वर्ष डॉक्टर अभावी रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. डॉक्टरची संख्या खूप कमी आहे. अनेक पोस्ट रिक्त आहेत. परिणामी रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे.
आज दिनांक ३१/१०/२०२२ रोजी रुग्णालयात १ ही प्रसुती तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे खूप दारुण अवस्था निर्माण झाली होती. जिल्हा रुग्णालयात योग्य प्रसुती तज्ञ डॉक्टर नसल्याने आज रुग्णांना कोल्हापूर, डेरवण, चिपळूण या रुग्णालयात जाण्याचा सल्ला अनिवार्यपणे देण्यात आला होता. ही परिस्थिती खूप गंभीर आहे. रुग्णांच्या जीवाशी होणारा हा खेळ थांबवला पाहिजे. आपण या विषयात गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा संख्येने डॉक्टर या रुग्णालयात तातडीने रुजू व्हावेत म्हणून योग्य निर्देश संबंधित विभागाला देऊन अतितत्पर पद्धतीने डॉक्टर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी भा.ज.पा. रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी केली आहे.