रत्नागिरी : जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहून 13 महिन्यापूर्वी बदलीने सोलापूर येथे गेलेले गट शिक्षणाधिकारी किरण लोहार 25 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी किरण लोहार तसेच अन्य एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने सापळा चून ताब्यात घेतले. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी यांच्यावर आरोप केल्यांनंतर शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत आले होते.
स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ते स्वीकारताना सोमवार 31 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाने रांगेहाथ पकडले.
किरण लोहार यांची 13 महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत काम केलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केले होते त्यामुळे लोहार यांना कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला.
सप्टेंबर 2018 मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या दोन्ही पदावरुन कार्यमुक्त केले होते. नंतर लोहार यांनी या कारवाई विरोधात कायदेशीर लढा देत कारवाईला स्थगिती मिळवली होती. त्यांना आता लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतल्यानंतर अनेक शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.