रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे एका 23 वर्षीय तरुणाने घरातील वाशाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार 30 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वा. च्या सुमारास घडली. राहुल एकनाथ जांभळे (23, जयगड, चरेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा रविवार 30 ऑक्टोबर रोजी दिवसभर घरीच होता. मात्र रात्री 9.30 वा. च्या सुमारास अचानक त्याने घराच्या मागील बाजूच्या पडवीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. घरातील व्यक्तींना त्यांचा मृतदेह दिसून आला. कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसला. त्याला खाली उतरवल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर राहुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र राहुलच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.