उस्मानाबाद :- (दीपक परेराव)शेतकऱ्यांना अतिवृष्टीची येत्या २ दिवसांत मदत देण्यात येईल, तसेच संततधारेमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आल्यावर उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि आ. पाटील यांना ठोस शब्द देण्यासाठी सरकारला भाग पाडले.
आमरण उपोषणा संदर्भात ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी भूमिका यावेळी अंबादास दानवे यांनी मांडली, त्यावर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर आमदार कैलास पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत नारळ पाणी घेऊन काही दिवसांसाठी उपोषण स्थगित केले.
सरकारने दखल घेतल्याने प्रलंबित पीक विमा, अतिवृष्टीचे अनुदान यासाठी गेल्या ७ दिवसांपासून उपोषणाला बसलेले शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या लढ्याला अखेर आज यश आलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज त्यांची उपोषणस्थळी भेट घेतली. या दरम्यान ती उपमुख्यमंत्री यांच्यासोबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी फोनवरुन संवाद साधला असता, त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले.
उद्धव ठाकरेंनी केले कौतुक
शेतकऱ्यांचा आवाज उठवल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार कैलास पाटील यांचे फोनवरून कौतूक केले. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करा, अशा सूचना दिल्या. मात्र उपोषण करताना जीवाचे बरं वाईट होणार नाही याची खबरदारी घ्यावी असा सल्ला दिला.