लांजा : तालुक्यातील वेरळ घाटात शुक्रवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा अपघात झाला. ही घटना झालेली असतानाच काही तासाच्या फरकाने आणखी एका कंटेनरचां त्या कंटेनरच्याच बाजूला अपघात झाला आहे. यामुळे वेरळ घाटातील अपघातांची मालिका काही केल्या पाठ सोडत नाही. मात्र दोन्ही अपघातात चालक बचावले आहेत.
वेरळ येथील अवघड वळणावर मोठया प्रमाणावर खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या जीवघेण्या घाटातील रस्त्याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. खड्डा वाचवण्याचा नादात अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. दुपारी 12.30 च्या दरम्यान एका कंटेनरला अपघात झाला होता. या ठिकाणची वाहतूक पोलिसांनी 4 वाजण्याच्या दरम्यान पूर्ववत केली. मात्र 2 तासाच्या फरकाने सायंकाळी 6.50 वाजण्याच्या सुमारास सकाळी पलटी झालेल्या कंटेनरच्या पुन्हा दुसऱ्या कंटेनरचा त्याच ठिकाणी अपघात झाला आहे. अंदाज न आल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात चालक बचावला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस पुन्हा घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुन्हा वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. काळोखामुळे पोलिसाना वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत. क्रेनची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र हा कंटेनर बाजूला करण्यात 3-4 तासाचा कालावधी लागू शकतो असे बोलले जात आहे. त्यामुळे आणखी वाहनांच्या रांगा महामार्गावर लागण्याची शक्यता आहे.