शिरुर: शिरुर तालुक्यातील न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असुन घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे दादा पाटील फराटे यांनी अशोक पवार यांच्यामुळेच घोडगंगा कारखान्यावर 450 कोटी रुपये कर्जाचा बोजा झाल्याचा आरोप केल्यानंतर शेतकरी विकास पॅनलचे अशोक पवार यांनी हा आरोप फेटाळत जर घोडगंगा कारखान्यावर 450 कोटी रुपयांच कर्ज असेल हे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध केल तर मी राजकारण सोडुन घरी बसेन आणि आरोप सिद्ध नाही झाला तर विरोधकांनी राजकारण सोडुन घरी बसण्याची तयारी ठेवावी असे उत्तर दिले आहे.
त्यानंतर शनिवार (दि 29) रोजी घोडगंगा किसान क्रांतीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे ,भाजप तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, भाजप किसान मोर्चाचे काकासाहेब खळदकर, आत्माराम फराटे ,गोविंद फराटे , वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार ,सचिन मचाले ,मनसेचे मेहबूब सय्यद,प्रवासी संघाचे अनिल बांडे आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना सुधीर फराटे म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांनी दिलेल्या आव्हानाचा आम्ही स्वीकार करतो. आमची चर्चा करण्याची तयारी असुन त्यांनी दोन दिवसात ठिकाण आणि वेळ ठरवावी. आम्ही सगळे जण त्या ठिकाणी येऊन समोरासमोर चर्चा करु आणि तिथंपत्रकारांनाही निमंत्रित करावे. परंतु जेव्हा 29 सप्टेंबरला 5 ते 6 हजार सभासद कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला हि चर्चा ऐकायला आले होते. तेव्हा आपण आपल्या बगलबच्चानां पुढे करुन गोधळं घालून अभ्यासु सभासदांना बोलू न देण्याचं षडयंत्र केल होत. परंतु सभासदांनी ते उधळून लावलं. त्यामुळे सभासदांना उत्तर द्यायला तुम्ही घाबरता का...? असा आम्हाला प्रश्न पडला आहे.
यावेळी भाजप किसान क्रांतीचे काकासाहेब खळदकर म्हणाले, अशोक पवार यांचे सुपुत्र ऋषीराज पवार हे घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याचा डंका पिटला जातोय. प्रत्यक्षात कारखाना स्थापनेपासुन संस्था प्रतिनिधी म्हणुन एक मतदार संघ आहे. ज्यामध्ये 26 संस्था प्रतिनिधी असुन त्यांच्याकडे 46 भाग आहेत. कारखाना स्थापनेपासुन 1500 शेअर्स या "ब" वर्ग संस्थेसाठी राखीव आहेत. त्यापैकी 46 शेअर्स त्यांनी फक्त दिलेले आहेत. या "ब" वर्ग मधील 130 संस्था तालुक्यात काम करत आहेत. "ब" वर्गात 130 संस्था कार्यरत असताना त्यापैकी 26 संस्थामधील फक्त 8 संस्था कारखान्याच्या सभासद आहेत. हाच मतदारसंघ घरच्या लोकांसाठी अशोक पवार यांनी सुरक्षित ठेवल्याचा आरोप यावेळी खळदकर यांनी केला. तसेच तालुक्यातील बाकीच्या इतर संस्था सभासद का...? करुन घेतल्या नाहीत. तसेच ऋषीराज पवार यांची वारस नोंद कधी झाली मग आतापर्यंत ५००० मयतांच्या वारसांची नोंद का झाली नाही असा प्रश्न खळदकर यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेतील काही ठळक मुद्दे
1) घोडगंगा कारखान्याच्या वार्षिक अहवालामध्ये घोडगंगाला 31 मार्च 2022 अखेर 426 कोटी देणे आहे.
2) नुकताच कारखान्याने गळित शुभारंभ केला व ऊसतोडीचे वेळापत्रक दिले. परंतु कारखाना वेळापत्रकापेक्षा १० दिवस उशिरा चालू झाला.
3) कारखाना उशिरा चालू झाल्याने उसाचे वजन घटले त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अंदाजे 1 कोटींचे नुकसान झाले.
4) कारखान्याच्या कामकाजासाठी प्रवासावर चार वर्षात 2 कोटी 64 लाख रुपयेचा खर्च झाला आहे.
5) हा खर्च कुठं केला सभासदाच्या पैशातुन प्रवासा खर्चाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार ॲड अशोक पवार यांनी कारखान्याच्या संदर्भात समोरासमोर येवून चर्चेची तयारी असल्याचे म्हटल्यानंतर ते आव्हान आम्ही स्विकारले असुन , चर्चेचे ठिकाण आणि वेळ तुम्हीच ठरवा आणि दोन दिवसात समोरासमोर चर्चा होऊद्या तसेच हि चर्चा सोशल मिडिया तसेच पत्रकारांसमोर करावी असे आवाहन घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे सुधीर फराटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात ऐन थंडीतही घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे वातावरण मात्र गरम झाले आहे.