पालम (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पेठपिंपळगाव मधील ऊसतोड कामगार पोचम्मा यल्लमा गायकवाड (४१) आणि त्यांची मुलगी रूपाली पोचम्मा गायकवाड (१६) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचे दुःखद निधन नुकतेच झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर अशी घटना घडल्याने व्यथित झालेले गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी मयतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेवून धीर दिला. आपुलकीने विचारपूस केली. त्यामुळे भारावून गेलेल्या रूक्मिणी गायकवाड यांनी आपल्या दाटलेल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली आणि 'सायेब, आधार असला की माणूस डोंगराही फोडतो ओ' असं म्हणत आपल्या पती आणि मुलीच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
याप्रसंगी बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, गायकवाड कुटुंबावर आलेला हा प्रसंग फारचं र्दुदैवी आहे. कुटुंबातला कर्ता पुरूष अकाली जाणं फारचं वेदनादायी असतं. मात्र, नियतीच्या पुढे माणूस हतबल असतो. शेवटी, मनुष्य जीवन म्हणजे तरी काय? सुख-दु:खाचा खेळचं असतो. म्हणून गायकवाड कुटुंबाने आता यातून बाहेर पडून सावरलं पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम त्यांच्या सोबत आहे. मयत पोचम्मा गायकवाड हे नोंदणीकृत ऊसतोड कामगार असल्याने मी शासकीय पातळीवर तातडीने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आज गायकवाड कुटुंबांना तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या उपस्थितीत आम्ही शासनाकडून ८ लक्ष रुपये आर्थिक मदतीचा धनादेश गायकवाड कुटुंबियांना देत आहोत. आम्हाला माहित आहे की, त्या मदतीच्या बदल्यात त्यांचे पती परत येवू शकणार नाहीत. कारण, जीव फारच मोलाचा असतो. परंतु भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून स्वत: ऊसतोड कामगारांनी लक्ष देवून काम करणे गरजेचे आहे.
याप्रसंगी मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने सुध्दा गायकवाड कुटुंबियांना भरघोस मदत करीत असल्याचे सांगत आ.डॉ.गुट्टे यांनी धनादेश रूक्मिणी गायकवाड यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी तहसीलदार प्रतिभा गोरे, गटविकास अधिकारी उदयसिंग शिसोदे, रासप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य गणेश दादा रोकडे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे, रासप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब एंगडे, बालासाहेब रोकडे, भगवान सिरसकर यांच्यासह पदधिकारी आणि कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करते. त्यामुळे लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होताना आम्हालाही आत्मिक समाधान मिळतं. मात्र, गायकवाड कुटुंबावर आलेली वेळ इतर कुणावरही येवू नये, असे सांगताना प्रतिष्ठानचे सचिव अॅड.मिलिंद क्षिरसागर यांचाही कंठ दाटून आला होता.