मुबंई : वेदांता - फॉक्सकॉन पाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. त्यासाठी, पाठपुरावा सुरू असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच यापूर्वी म्हटलं होतं. मात्र, आता हाही प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र भविष्यात वेदांता किंवा टाटा एअरबसपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार असल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात यावा यासाठी मी प्रयत्न केले. युवा पिढीसाठी मी प्रयत्न केला त्यात माझं काही चुकलं नाही. रोजगार देण्यासाठी नुसत्या गप्पा मारुन काही उपयोग नाही, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
टाटा एअरबसच्या प्रकल्पाबाबत अशी माहिती समोर आली की, २१ सप्टेंबर २०२१ रोजी या प्रकल्पाबाबतचा सामज्यंस करार झाला होता. मात्र, करार झाला होता तर त्याबाबतचे मला एकतरी पत्र दाखववावे, असं आव्हान उदय सामंत यांनी विरोधकांना दिलं आहे. तसेच भविष्यात वेदांता किंवा टाटा एअरबसपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार आहे. त्यामुळं बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल. राजकारणासाठी राजकारण करु नये, विकासासाठी सर्वांनी एकत्र येण गरजेचं असल्याचं आवाहान देखील उदय सामंत यांनी केलं आहे.