चिपळूण : येथील मध्यवर्ती एस्.टी. बस स्थानकाच्या राखडलेल्या कामाबाबत शिवसेनेसह सर्व पक्षीयांनी आवाज उठवला तरीही प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आता या कामाला महिनाभरात कामाला सरुवात करा. अन्यथा चिपळूण बस स्थानकात गाई, म्हशी आणि कोंबड्या, कुत्री, गाढवं आणून बांधणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गुहागर विधानसभा मतदार संघ चिपळूणचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिला आहे.

चिपळूण बस स्थानकाच्या कामाला चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली. चारवर्षे अतिशय संथ गतीने काम सुरु आहे. सवातीला पिलरसाठी उभे केलेले स्टील आता गंजले आहे, खड्डे बुजले आहेत. काम अर्धवट स्थितीत ठेवून जुनी इमारत जमिनदोस्त करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना अतिशय तुटपुज्या जागेत वावरावे लागते. एकखाद्या फलाटावर लागलेली गाडी पाहण्यासाठी धावपळ करावी लागते. उन-पाऊस झेलत ग्रामीण भागातला सामान्य प्रवासी गेली चार वर्ष त्रास सहन करतोय. परंतु एस्.टी. प्रशासनाला हे दिसत नाही असा प्रश्न तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी विचारला आहे. हे एस. टी. बस स्थानक व्हावे यासाठी प्रशासनाचे श्राद्ध घालून झाले तरीही यंत्रणेला जाग नाही. चार वर्षात कामाची अजिबात प्रगती नाही. ठेकेदाराचे तोंड दिसत नाही. आमचे सरकार असतानाही आम्ही आवाज उठविला होता व आताही उठवित आहोत.

आता हद्द झाली. काम वेळेत सुरु न करता जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रयत्न सहन करणार नाही. या अपूर्ण बांधकामाच्या ठिकाणी गाई म्हशी, कोंबडी, कुत्री, गाढवं आणून बांधून निषेध व्यक्त करणार असल्याचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी सांगितले. या वेळी विभाग प्रमुख राम डिगे व सहकारी उपस्थित होते.