रत्नागिरी : शहरानजीकच्या साई भूमीनगर येथे साहिल मोरे (22, रा. अलावा, रत्नागिरी) याने आत्महत्या केल्याची घटना 21 ऑक्टोबर 2022 रोजी घडली होती. मैत्रिणीच्या फ्लॅटवर तो आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या आत्महत्येनंतर रत्नागिरीत उलट सुलट चर्चा रंगत होत्या. मात्र आता साहीलच्या नातेवाईकांनीच साहिलच्या प्रेयसी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिताली अरविंद भाटकर (24, रा. तोणदे, रत्नागिरी) असे या प्रेयसीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल मोरे आणि मिताली हीचे गेली 2-3 वर्षे प्रेमसंबंध होते. या प्रेमातून त्यांच्या आणाभाका झाल्या होत्या. त्यानंतर साहिलने तिच्याकडे लग्नासंदर्भात विचारणा केली. मात्र मिताली टाळाटाळ करत होती. तिने लग्नाला नकार दिला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे साहिल घाबरला होता. आपल्या प्रेमाबद्दल अनेकांना माहिती आहे. मात्र आपण लग्न केले नाही तर आपली बदनामी होईल याची त्याला भीती वाटत होती. 

21 ऑक्टोबर 2022 रोजी साहिल हा शहरालगतच्या साई भूमीनगर येथे मैत्रीच्या फ्लॅटवर आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळला. त्याच्या आत्महत्येपूर्वी सकाळी प्रेयसी मिताली फ्लॅटवर होती. मात्र त्यानंतर मितालीला साहिल फ्लॅटच्या किचनमध्ये गळ्यात पट्टा अडकवून गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. दरम्यान साहिल याने गळफास घेतलेला पाहून मिताली ही पूर्णपणे घाबरून गेली होती. तिने घाबरलेल्या स्थितीतच साहिलच्या बहिणीला फोन केला. प्रेयसी मितालीने मन धीट करून त्याच्या मानेभोवती असलेला पट्टा चाकूच्या सहाय्याने कापून मृतदेह खाली उतरवला होता. तोपर्यंत साहिलची बहीण घटनास्थळी पोहोचली होती. तिने एका मित्राच्या मदतीने जिल्हा शासकीय रूग्णालय दाखल केले. तिथे डॉक्टरांनी साहिल याला तपासून मृत घोषित केले. साहिलच्या मृत्यूची बातमी कळताच सारे कुटुंब हळहळले. अचानक मृत्यूने कुटुंबाने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. कारण सकाळी साहिल घरातून निघताना व्यवस्थित घरातील व्यक्तींशी बोलून गेला होता. असे असेल तर तो आत्महत्या का करेल असे अनेक प्रश्न कुटुंबीयांना पडले होते. त्यांनी पोलिसांसमोर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. मात्र प्रथम दर्शनी ती आत्महत्या असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर शवविच्छेदन अहवालातही आत्महत्याच असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान साहिलच्या बहिणीने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. यामध्ये तिने म्हटले आहे की, साहिल याला आत्महत्या करण्यास प्रेयसी मिताली हीने प्रवृत्त केले आहे. तसेच मिताली हिने लग्नाला नकार दिल्याने बदनामीच्या भीतीने साहिल याने आत्महत्या केली, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी मिताली हिच्यावर भादंवि कलम 306 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस आहेत.