सोलापूर - श्री माणिक स्वामी मंदिराच्या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य महामस्तकाभिषेक झाल्यानंतर सकल भक्तगणांनी श्री. कलिकुंड पार्श्वनाथ भगवंतांची आराधना केली. मूलनायक पार्श्वनाथ भगवंतांवर नवलबाई बोंदार्डे परिवारातर्फे छत्र अर्पण करण्यात आले.दोन दिवशीय भक्तिपूर्ण कार्यक्रमाची सांगता वालचंद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी मधील मंगल प्रवचन व भक्तीगीता नंतर महाप्रसादाने झाली. 

आदिनाथ भगवंतांच्या प्रतिमेवर प्रभाचंद्र शास्त्री परिवाराच्यावतीने छत्र तसेच अनंतनाथ भगवंतांच्या प्रतिमेवर सागर शिरसाड परिवारातर्फे छत्र अर्पण करण्यात आले. यानंतर प्रदीप शहा परिवाराच्या वतीने सुंदर श्रुत पीठ स्थापन होऊन त्यावर जिनवाणी अर्थात शास्त्र स्थापन करण्यात आले. 

औरंगाबाद येथील रवी मसाले परिवाराचे फुलचंद जैन यांच्या हस्ते आचार्य श्री शांतीसागर महाराजांसाठी सिंहासनाची प्रतिमा स्थापित करण्यात आली. देवेंद्र बबलादी यांच्या हस्ते नवीन भव्य पालखीचे पूजन झाले. 

यानंतर शेकडोच्या संख्येने पालखी मिरवणुकीत भाविक उपस्थित होते. प्रतिष्ठाचार्य डॉ. महावीर शास्त्री यांच्या विधी मार्गदर्शनात तसेच संगीतकार अक्षय पाटील कोल्हापूर यांच्या संगीत मार्गदर्शनात सोहळा अत्यंत भव्य सोहळा भट्टारकश्री अकलंक स्वामिजी यांच्या सानिध्यात संपन्न झाला.  

विजापूर येथील दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष डी. आर. शहा इंडीकर, डॉ. रणजीत गांधी व सौ माया गांधी व समस्त परिवार तसेच समस्त  श्रावकांचा उत्कृष्ट जीर्णोद्धाराबद्दल सन्मान करून स्वामींजींकडून आशीर्वाद देण्यात आले. यावेळी महत्त्वपूर्ण अशा बीजस्तंभाची पूजा संपन्न झाली. त्यामध्ये विक्रम गांधी, वैशाली गांधी, निवृत्त प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे,अनिल माणिकशेटे, प्रदीप शहा, श्रीमती शिराढोणकर, भोगेश आळंद, डॉ. पंकज डोळस, विशाल पंडित आदी मान्यवरांनी महाबीज स्तंभ स्थापन करीत त्यांची पूजा संपन्न झाली. पालखीच्या अग्रभागी समस्त गांधी परिवार, पालखी दाता बबलादी परिवार, वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त भूषण शहा, पराग शहा, अरविंद शहा, प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, प्राचार्य अशितोश शहा, डॉ. आश्विन बोंदार्डे आदी सहभागी होते.

आतापासूनच पुण्यकर्मात सहभागी व्हा – भट्टारकश्री

हजारो कोटीच्या जन्मानंतर मिळालेले उच्चकोटीतील मुनुष्य जीवन सफल करण्यासाठी मिळालेले आयुष्य अल्प आहे, त्यामुळे आतापासूनच खऱ्या अर्थ्याने पुण्यकर्मात स्वतःला झोकून द्या, असे मौलिक प्रवचन सौंदा मठाचे भट्टारकश्री अकलंक स्वामीजी यांनी वालचंद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्रवचनात केला. 

निमित होते पर्युषण महापर्वाच्या पूर्व संध्येला श्री माणिक स्वामी दिगंबर जैन मंदिराचा शुद्धी सोहळाच्या सांगता वालचंद शिक्षण समूह आयोजित मंगल प्रवचन व भक्तीगीत मध्ये श्री स्वामी बोलत होते. प्रारंभी डब्ल्यू. आय. टी. च्या प्रांगणात स्वामीजींचे आगमन झाले, त्यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी आणि त्याच्या धर्म पत्नी सौ. माया गांधी यांचे पद्पूजन केले. यावेळी गांधी कुटुंबीयासह संस्थेतील सर्व प्राचार्य, शिक्षक, प्राध्यपक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

जे पेराल तेच उगवणार आहे हे पटवून देण्यासाठी स्वामीजींनी आपल्या अमोघवाणीतून कथानकही सांगितले. आपल्या भारदस्त आवाजाच्या गोडव्यातून जयसिंगपूरचे अक्षय पाटील यांनी भजन गान गाऊन वातावरणात चैतन्य निर्माण केले. त्यांना की-बोर्डवर रोहन शहा, आदित्य देसाई पॅडवर, तबलावर रमेश सुतार आणि ढोलकीवर पिंटू पवार यांची साथ लाभली. सूत्रसंचालन प्रा. महावीर शास्त्री यांनी केले तर विश्वस्त श्री पराग शहा यांनी आभार मानले.