राज्याच्या वाट्याला आलेले मोठे प्रकल्प हे गुजरातने पळवण्यावरुन आतापर्यंत चांगलंच राजकारण तापलंय. नुकतंच वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला होता. वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. नागपूरमधील मिहानमध्ये टाटा एअरबस प्रकल्प होणार होता. मात्र हा प्रकल्प गुजरातमध्ये गेलाय. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सी-295 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल, असं म्हटलं होतं. मात्र गुजरातनं हा प्रकल्पही पळवला. यावरुन राजकारण चांगलंच तापलंय.
दिवाळीनंतर पुन्हा एकदा राजकीय बॉम्ब फुटला असून वेदांता-फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा-एअरबस सी-२९५ हा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. टाटा एअरबस प्रकल्पांतर्गत विमानांची निर्मिती गुजरातमधील वडोदरा येथील प्लांटमध्ये करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता,पण आता गुजरातला गेल्याचा आरोप महाआघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
उदय सामंत यांनी म्हटले आहे की, विरोधकांकडे टीका करण्यापलीकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे काहीही काम नाही. २१ सप्टेंबर २०२१ रोजी याचा एमओयू केंद्र सरकारने केला होता. एका वर्षापूर्वीच हा प्रकल्प गुजरातला उभा करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता, तरीदेखील आम्ही प्रयत्न करू, असं मी म्हटलं होतं मात्र आता तो प्रकल्प गुजरातला उभा रहात आहे.
एका वर्षापूर्वीच जो प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय झाला आहे. शिळ्या कढीला उकळी फोडण्याला काहीच अर्थ नाही. एमओयू झाल्यानंतर मागच्या सरकारचं एकही पत्र उद्योग विभागात सापडलं नाही. सत्तेत असताना ज्यांनी या प्रोजेक्टसाठी प्रयत्न केले नाहीत, त्यांनी युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्यात अर्थ नाही. एका वर्षापूर्वीच गेलेला प्रकल्प आता गेला असं सांगून संभ्रम निर्माण करण्यात अर्थ नाही,'असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.