औरंगाबाद: तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीसंदर्भात न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. एक-दोन गुंठे जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास बंदी घालण्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने घेतला आहे.
राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठानं रद्द केले होते. पण या निर्णयाविरोधात पुनराविलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढची सुनावणी 16 नोव्हेंबरला होणार असल्याचे असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे
नेमकं प्रकरण काय?
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 12 जुलै 2021 रोजी तुकडेबंदी तुकडेजोड सुधारणा अधिनियमाच्या कलम-ब नुसार परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार एक-दोन गुंठे जागेचा व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचं रेखांकन करुन जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास दस्त नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार नाकारले जात होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.