रत्नागिरी : ठाण्यातील सोन्या-चांदीचे व्यापारी किर्तीकुमार कोठारी यांचा रत्नागिरीत निर्घृण खून झाल्यानंतर परजिल्ह्यातून, राज्यातून येणाऱ्या व्यक्तींची इत्यंभूत माहिती ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसदलाने विशेष ॲप विकसित केले आहे. व्हीएमएस (व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम) असे त्या ॲपचे नाव आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे ॲप तयार केले आहे. जिल्ह्यात येऊन गुन्हे करून जाणाऱ्यांना यामुळे चाप बसणार आहे. लॉज, हॉटेलला येणाऱ्या व्यक्तींची माहिती या ॲपमध्ये अपलोड केली जाणार आहे. जेणेकरून काही घटना घडल्यास संबंधितांचा मार्ग काढणे सोपे जाणार आहे; मात्र हॉटेल असोसिएशनला विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
रत्नागिरी शहरातील भरवस्तीमध्ये ठाण्यातील सोन्या चांदीचे व्यापारी किर्तीकुमार कोठारी यांचा त्रिमूर्ती ज्वेलर्स या दुकानात गळा दाबून खून करण्यात आला. गेल्या महिन्यात १९ तारखेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तीन दिवसात या गुन्ह्याचा उलगडा केला. कोठारी हे रत्नागिरीत व्यापारासाठी आले होते; मात्र रात्री ते अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. कोठारी मुक्कामाला श्रद्धा लॉजला होते; परंतु ते परत गेलेच नाहीत. त्यांच्याशी संपर्क होत नाही व मोबाईल फोन स्वीचऑफ आला अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. सीसीटीव्ही फूटेजमध्ये कोठारी त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात गेले ते पुन्हा बाहेर आले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस आला. यापूर्वी देखील रत्नागिरी लॉजवर येऊन काही चोरट्यांनी चोरी करून येथून फरार झाले आहेत. अन्य गुन्ह्यातील गुन्हेगारांनीदेखील आश्रयासाठी जिल्ह्यातील लॉजचा वापर केल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे.
भविष्यात या घटना टाळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींची माहिती ठेवण्यासाठी ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये येणाऱ्या व्यक्तीच्या फोटोसह आधारकार्ड, पॅनकार्ड, ज्या वाहनाने आले त्या वाहनाचा नंबरदेखील आदी माहिती भरून घेतली जाणार आहे. त्यामध्ये फिड केला जाणार आहे. कोणतीही गुन्हा किंवा घटना घडल्यास संबंधित व्यक्तीचा माग काढणे आणि गुन्ह्याची उकल करणे सोपे जाणार आहे. जिल्हाभरात त्यासाठी हॉटेल, लॉज आदींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. गोव्यासह अन्य राज्यात अशा प्रकारचे ॲप विकसित झाले आहे. त्यानंतर जिल्ह्यात हे ॲप विकसित होत आहे.
• असोसिएशनला विश्वासात घेऊनच निर्णय
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल व लॉजिंग व्यवसाय आहेत. पर्यटनासाठी किंवा अन्य कारणांसाठी येणाऱ्या व्यक्ती आपली ठराविक माहिती देऊन तेथे आश्रय घेतात; परंतु त्यांची इत्थंभूत माहिती घेतल्यास हॉटेल, लॉजिंग व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्यावसायिकाना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या काही सूचनांचा त्यामध्ये सामावेश करता येतो का याचा विचार होणार आहे. त्यासाठी उद्या जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिसांची चर्चा होणार आहे. त्यानंतर या ॲपची अंमलबजावणी सुरू होईल.