रत्नागिरी : ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी यांच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोठारी यांचा शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात 19 सप्टेंबर 2022 रोजी खून करण्यात आला होता. या दुकानातील सीसीटीव्ही 18 सप्टेंबर रोजी दुपारीच बंद करण्यात आले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे संशयितांनी अतिशय थंड डोक्याने व आधीपासून योजना आखून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट होत आहे.

शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेच पोलिसांना कोठारी यांचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी खून करण्यात आलेले त्रिमूर्ती ज्वेलर्स व आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यास सुरूवात केली. यावेळी त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही एक दिवसापूर्वीच बंद करून ठेवण्यात आले आल्याचे समोर आले आहे. असे असले तरी पोलिसांकडून त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड करणारा डीव्हीआर हस्तगत केला आहे. त्यानुसार पुढील तपास करण्यात येत आहे.

रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी हे व्यापारी कोठारी यांच्या खूनाचा तपास करत आहेत. मागील काही दिवसांपासून कोठारी खून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. खून प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यात येत आहेत. 19 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी यांचा आर्थिक व्यवहारातून शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (42, खालची आळी रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलपसाद चौगुले (39, मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महमूद होडेकर (36, भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली आहे.

किर्तीकुमार कोठारी यांचा खून केल्यानंतर 19 सप्टेंबर रोजी तीनही संशयितांनी रात्री दीडच्या सुमारास त्यांचा मृतदेह एका गोणीत भरून महेश चौगुले याच्या रिक्षातून आबलोलीतील जंगलमय परिसरातील पऱ्यामध्ये फेकून दिला. कोठारी रत्नागिरी येथून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा करण याने शहर पोलिसांत दाखल केली होती. यानंतर पोलिसांकडून शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते.

सीसीटिव्ही फुटेजमध्ये किर्तीकुमार कोठारी दुकानात जाताना दिसून आले. मात्र दुकानातून बाहेर पडताना दिसून आले नाहीत. यामुळे याच ठिकाणी घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला यानंतर रात्री दीडच्या सुमारास मृतदेह गोणीत भरून रिक्षामध्ये टाकण्यात आला. हा सर्व पकार सीसीटिव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. यानंतर रिक्षा रत्नागिरी शहरातून मजगांव पाटीलवाडीमार्गे गुहागर आबलोली येथे नेण्यात आली. कोठारी यांच्या खून प्रकरणाची उकल सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानातील बंद करण्यात आलेले सीसीटीव्ही हे खूनाची आधीपासून योजना आखण्यात असल्याकडे इशारा करत असल्याने बंद केलेले सीसी टिव्ही रेकॉर्डिंग हा देखील एक महत्वाचा पुरावा ठरत आहे.