चिपळूण : तालुक्यातील नागावे येथील सुकाईदेवी मंदिरात कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा-3 अंतर्गत कोयना प्रकल्पग्रस्त संघटनेची बैठक नुकतीच झाली. यावेळी आक्रमक होत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा, मगच कोळकेवाडी धरणातील पाणी अन्य गावांना द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर शिंदे, कार्याध्यक्ष सदाशिव बैकर, सचिव अनंत शिंदे, उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, खजिनदार दत्ताराम वीर, महेश जंगम, कृष्णा साळवी आदींसह 70 प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
कोळकेवाडी, नागावे, अलोरे, पेढांबे, पिंपळी खुर्द, पिंपळी बु. येथील टप्पा-3 चे प्रकल्पग्रस्तांची गावनिहाय क-पत्रक तसेच संकलन नोंद रजिस्टरप्रमाणे सुधारित यादी तयार करून तसा प्रस्ताव उपजिल्हाधिकारी पुनर्वसन रत्नागिरी यांनी अपर मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांच्याकडे पुढील कार्यवाही सादर करण्यात यावा. प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना पात्रतेप्रमाणे नोकरीत प्राधान्य देण्यात यावे किंवा चाळीस लाखांचे आर्थिक पॅकेज द्यावे, महाजनको निर्मिती केंद्र संकुल पोफळी येथे सर्वसमावेशक योजनेंतर्गत पात्रतेप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यात यावे, आदी प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.