संगमेश्वर : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खोखो प्रशिक्षण व सराव शिबिराचा प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रशिक्षण व सराव शिबिरासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू, खो-खो संघटक व आंतरराष्ट्रीय पंच समीर काबदूले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनंजय दळवी यांनी करताना खो-खो खेळाच्या प्रशिक्षण व सराव शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. प्रशिक्षक समीर काबदूले यांच्या खो-खो खेळातील खेळाडू, संघटक व आंतरराष्ट्रीय पंच या यशस्वी प्रवासाची उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी प्रशिक्षक समीर काबदुले यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत केले. प्राचार्य सरांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मिठाई वाटून शिबिराचा प्रारंभ केला.
यानंतर प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थी खेळाडूंबरोबर संवाद साधताना सांगितले की, खो-खो हा खेळ चपळता, चिकाटी व संयमाचा खेळ असल्याने अधिकाधिक सरावासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी कोणत्या आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे व कोणते पदार्थ खाणे टाळावे याबाबत सविस्तर विवेचन केले. प्रशिक्षक समीर काबदुले यांनी आधुनिक खो-खो खेळात झालेले बदल, त्या दृष्टीने प्रशिक्षण व सरावांमध्ये केले जाणारे वर्कआउट, खो-खो खेळामुळे शरीर संपदा घडवण्यासाठी होणारा उपयोग आणि इतर खेळांसाठीची होणारी तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली.
या शिबिराच्या आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभूदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी आयोजकांचे कौतुक करून विद्यार्थी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.