रत्नागिरी : उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची राजकारणात एंट्री करण्याची शक्यता आहे. सिंधुरत्न योजनेच्या सदस्यपदी किरण सामंत यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

गेली अनेक वर्ष किरण सामंत सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट बोर्डवर ते सदस्य आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामासाठी ते प्रयत्न करीत असतात. किरण सामंत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. त्यांची नुकतीच सिंधुरत्न योजनेच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे किरण सामंत यांचे अनेकांनी अभिनंदन केले. विशेष म्हणजे उदय सामंत यांच्यासोबत सर्वच राजकीय घडामोडीत वजीर आणि किंगमेकर म्हणून किरण सामंत यांचा उल्लेख केला जातो. त्यामुळे आता राजकारणाच्या मैदानात किरण सामंत एंट्री करणार असल्याची शक्यता व्यक्त आहे. तर, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून शिंदे गटाकडून खासदारकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे राजकरणात किरण सामंत प्रवेश करण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.