आज दिवाळीलाच झेंडू फूल खातोय भाव!

पाचोड (विजय चिडे)-आज दिवाळी असल्यामुळे झेंडूची फुलांची खरेदीसाठी पाचोड सह ता.पैठण तालुक्यातिल बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली होती. बाजारात पिवळ्या, भगव्या, मखमली झेंडूसह शेवंती, अँस्टर आदी फुलांची मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्रिच्या दृष्टीने आवक झाली होती. ऐन दिवाळी सण आला असतानाच सततच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादन घटले आहे. परिणामी ७५ टक्के फुलांचे नुकसान झाल्याने बाजारपेठांमधील आवक घटली. दिवाळीलाच झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. आवक आणि मागणीत तफावत निर्माण झाल्याने फुलांचे दरात विक्रमी वाढ झाली असल्याचे पहावायास मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे फुलांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फुलांवर बुरशीजन्य रोगामुळे ती खराब झालेली आहे. तसेच कीड आणि अळ्या पडल्याने फुले काळी पडलेली आहे. शेतातील फुलांचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनेक रसायनांची फवारणी करण्यात येत आहे. परंतु, रोगांचा प्रादुर्भाव अधिक असल्याने कीड कमी होताना दिसत नाही. फुलांची गळती अद्यापही थांबलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले असताना उत्पादनही ७५ टक्के कमी झालेले आहे. त्याचा फटका येत्या सणासुदीच्या दिवसात बसण्याची शक्यता आहे. अद्याप फुलांची आवक आणि मागणी दोन्ही सारखी असल्याने भाव स्थिरावलेले आहेत.

फुलविक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. ओला आणि सुका झेंडू अशा दोन प्रकारांत फुलांची विक्री होत असून ओला झेंडू सध्या होलसेलमध्ये ३० रुपये किलोने, तर सुका झेंडू ६० रुपये किलोने विक्री होत आहे. मात्र,आज नववी आणि दिवाळी सणाला फुलांची प्रचंड मागणी असते. खराब झेंडुमुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दिवसेंदिवस झेंडूच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. झेंडूमध्ये कोलकता झेंडू, पिवळा झेंडू अशा वेगवेगळ्या प्रकारांतील झेंडूची फुले बाजारात उपलब्ध आहेत. झेंडू ६० ते ८० रुपये किलो असून तो १५० ते २०० रुपये किलोवर पोहोचणार आहे. शेवंती सध्या ८० रूपये असून लवकरच १५० रुपये गाठेल, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

चौकट "सततच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांची आवक कमी झालेली आहे. इंधनाचे वाढलेले दर आणि मजुरांच्या मजुरीत झालेल्या वाढीचाही फटका फूल शेतीला बसलेला आहे. त्यामुळे आज दरात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे.

मुरलीधर निर्मळ,झेंडू फुल उत्पादक,मुरमा.