पोलिसांनी व्यक्त केल्या भावना"
जनतेच्या सुरक्षेसाठी करावी लागते चोविस तास ड्यूटी...
पाचोड (विजय चिडे) सहकुटुंब, मित्र परिवारासोबत दिवाळी साजरी करताना धम्माल येतेच शाळांना सुट्ट्या असल्याने अनेकजण बाहेर फिरण्याचे बेत आखतात.दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईकही एकमेकांच्या घरी जातात. दिवाळीतील वातावरण खूपच आनंददायीबरोबर रांगोळ्या आणि दिव्यांनी संपूर्ण परिसर उजाळून निघतो. मात्र, दिवाळी असो की अन्य कोणता सण ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहे ते 'पोलिस' मात्र दिवाळीतही कुटुंबापासून दूर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे महत्वपूर्ण काम करत असतात. 'जनतेची सुरक्षा हीच आमची दिवाळी' असून आम्ही दिवाळीत घरी नसलो तरी नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यातच आमचा आनंद असल्याच्या भावना पोलिसांनी व्यक्त केल्या.
पोलिस ऑनड्युटी चोवीस तास काम करत असतात. घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा कधी घरी परतू याची काहीच कल्पना नसते. पोलिसांच्या कामाचे तास निश्चित नसल्याने अनेकदा ड्युटी संपल्यानंतर अचानक काहीतरी अनुचित प्रकार घडतो आणि पुन्हा बंदोबस्तावर जावे लागते. अनेकदा तपासासाठी बाहेरही जाण्याची वेळ येते. पोलिसांच्या नशिबी साप्ताहिक सुट्टी नसते. सण, उत्सवामध्ये सुट्ट्या रद्द होतात. अहोरात्र अंगावर खाकी युनिफॉर्म घालून पोलिस अधिकारी, कर्मचारी जनतेच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळत असून घरी किंवा अन्य कोणता कार्यक्रम असला तरी कर्तव्याला पोलिस प्राधान्य देतात. कुटुंबासोबत सण, उत्सव साजरी करण्याचे पोलिसांना भाग्य क्वचितच लाभत असून अनेकदा सणामध्ये सुट्टी घेण्याचा आग्रह मुले, पत्नीकडून होत असतो. परंतु कामाचा व्याप इतका असतो की घरी थांबणे शक्य नसते. कुटुंबाची समजूत काढून पोलिस घरातून बाहेर पडतो. कालांतराने कुटुंबालाही सवय होते आणि नंतर कुटुंबाकडून आग्रह केला जात नाही, अशा भावना पोलिस व्यक्त करतात.
सध्या दिवाळीची सर्वत्र धामधूम असून प्रत्येकाच्य चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद ओसांडून वाहत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली असून घरातून दिवाळीच्या फराळाचा सुगंध दरवळू लागला आहे. बच्चेकंपनी गड, किल्ले बनवण्यात मग्न असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी दिव्याची रोषणाई करण्यात आली असून लहानापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वजण दिवाळीची मजा लुटत असताना दिवाळी शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस आपले चोख कर्तव्य बजावत आहेत. कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक पोलिसांची इच्छा असते. मात्र प्रत्येकालाच सुट्टी देणे शक्य नाही. अशावेळी मनुष्यबळाची कमरता भासू शकते. शिवाय पोलिस ठाण्यापासून जवळ राहणाऱ्या पोलिसांना थोडावेळ घरी जाण्याची संधी मिळते. जेणेकरून तातडीची गरज भासल्यास पुन्हा या कर्मचाऱ्याना बोलवणे शक्य होईल. परंतु इतर कर्मचारी नेहमीप्रमाणे दिवाळीतही ड्युटी करतात. दिवाळीतही रात्री ११ वाजेपर्यंत कर्मचारी कर्तव्यावर असतात. कामाच्या व्यापामुळे भाऊबीजेच्या दिवशी बहिणीना न बोलावता नंतर बहिणीना बोलवले जाते. जनतेची सुरक्षा हीच आमची दिवाळी असल्याची भावना पोलिस व्यक्त करत आहेत.
चौकट- दिवाळीत बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळलेली असते. शिवाय दिवाळीत नवीन कपडे घालून दिवाळी साजरी करण्यासाठी रस्त्यावर जमतात. अशा वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. नागरिकांना निर्विघ्नपणे दिवाळीची मजा लुटता यावी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जाते. महिला पोलिस कर्मचारी वाहतुकीच्या नियोजनासाठी तैनात केलेल्या असतात. त्यामुळे वाहतूक पोलिंसानाही दिवाळीत घरी वेळ देता नाही.