लांजाः तालुक्यातील यश कंस्ट्रक्शन कंपनीचे बँक खाते हॅक करून त्यातील 92 लाख 50 हजार रुपये लांबवले होते. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. अब्दुल मुजित मोतीआर (वय 38, रा. बुरुज बजबज, जि. साऊथ, पश्चिम बंगाल) असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, नासीर नावळेकर, मंगेश कोलापटे यांचे पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झाले होते. पश्चिम बंगाल येथील पोलिसांची मदत घेत या पथकाने पैशांच्या व्यवहारात संशयित आरोपी अब्दुल मुजित मोतीआर याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सायबर हॅकरने आधी कंपनीच्या मालकाचे सिमकार्ड बंद केले. त्यानंतर कंपनीच्या बँक खात्यातून दि. 4 ऑक्टोबरला सकाळी 11.30 ते 12 वाजण्याचा सुमारास अवघ्या 30 मिनटांत बँकेचे स्टार टोकन ॲप हॅक करून 92 लाख 50 हजार रुपयांवर डल्ला मारला. हा प्रकार दि. 7 ऑक्टोबरला लक्षात आल्यानंतर मालकाने लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याविषयी पोलिसांनी तपास केल्यानंतर या बँक खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यामध्ये जमा केल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक दादासाहेब गुटुकडे करत आहे.