रत्नागिरीः राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नेमलेल्या नर्सेसना केंद्र शासनाने धक्का दिला आहे. राज्यातील तब्बल ५९७ नर्सेसच्या नोकऱ्यांवर गदा आली असून ३१ ऑक्टोबरपासून त्यांना काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १९ नर्सेसचा समावेश असून त्याची सेवा या आदेशामुळे समाप्त होणार आहे. ऐन दिवाळीत शासनाने हा निर्णय घेऊन या महिलांची दिवाळी कडू केली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या बिगर आदिवासी क्षेत्रात ३२०७ एएनएममदे २०२२-२३ मध्ये प्रस्तावित करण्यात आली होती. त्या बाबतचा महाराष्ट्राच्या आरोग्य सेवा आयुक्त स्तरावरून तेवढीच पदे प्रस्तावित करणारा अंमलबजावणीचा आराखडा मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला होता. त्यातील २ हजार ६१० पदे मंजुरी मिळाली होती. त्यानुसार नर्सेसना आरोग्य विभागाकडून नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत.
मागील वर्षात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील परिचारिका पदे रद्द करावीत. ज्यांचे काम असमाधानकारक आहे, अशांना कमी करावे. ज्यांची सेवा कमी झाली आहे (सेवा ज्येष्ठतेनुसार) त्यांना कमी करावे, असे आदेशात म्हटले. मागील वर्षीही परिचारिका सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली होती; परंतु अचानक दिलेले आदेश रद्द करून त्यांची सेवा समाप्त करू नये असे नव्याने आदेश काढण्यात आले होते; पण आता यावर्षी केंद्राकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल ५९७ नर्सेसची नोकरी ३१ ऑक्टोबरपासून समाप्तीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यामुळे या अभियानातील नर्सेस ऐन दिवाळीत संकटात पडल्या आहेत. राज्यात या अभियानांतर्गत २६१० पदांना मंजुरी लाभली होती; पण आता ५९७ पदे समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत.