रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आ. नितेश राणे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरत बदनामी वक्तव्य करून दोन राजकीय पक्षांमध्ये संघर्ष व्हावा आणि समाजात तेढ निर्माण व्हावी, यासाठी प्रवूत्त करणाऱ्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध तत्काळ कायदेशीर करावी, अशी मागणी भाजपच्या रत्नागिरी कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हे निवेदन डॉ. गर्ग यांच्यासह रत्नागिरी ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या भाषणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याबद्दल शिवराळ आणि बदनामीकारक भाषा वापरली. यामुळे दोन राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होण्यास भास्कर जाधव यांनी प्रवृत्त केले असून भास्कर जाधव यांच्यामुळे दोन गटांमध्ये दोन पक्षांमध्ये तेढ निर्माण होऊन संघर्ष होईल, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. त्यांच्या या कृत्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना चिथावणी प्राप्त झाली असून त्यातून दंगे घडून येण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे हे आमच्यासाठी वंदनीय नेते असून आ. जाधव यांच्या या निदनीय कृत्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करून सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या या कृत्याची दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर चव्हाण, प्रवक्ते नित्यानंद दळवी, अशोक वाडेकर, धनंजय पाथरे, संकेत कदम, यातील शिवलकर, अक्षय चाळके, पिंट्या देसाई, श्रीनाथ सावंत, अक्षय पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. गर्ग यांनीही चौकशी करून कारवाईचे आश्वासन उपस्थितांना दिले आहे. अशाच प्रकारचे निवेदन विविध ठिकाणी पाठवण्यात आला असून पुणे, कोल्हापूर येथील कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेआहेत. तेथेही आ. भास्कर जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करणारे त्या त्या पोलिस स्थानकामध्ये देण्यात आले आहे