परभणी, दि.19(प्रतिनिधी): राज्य शासनाने राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा यंदा प्रथमच आयोजीत केली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील पाथरी तालूक्यातील देवनांदरा येथील स्वराज्य गणेश मंडळाला राज्य शासनाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुंबई येथील रविंद्रनाथ नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विद्या वाघमारे यांच्या हस्ते स्वराज्य गणेश मंडळाचे अध्यक्षा शिवनंदा थोरे आणि सचिव नारायण साळवे यांचा 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
देशभक्ती, राष्ट्रउन्नती आणि राज्याची प्रगती दाखविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत साकारण्यात येणारे देखावे. यावर्षी प्रथमच उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील 356 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गणेशोत्सव कालावधीत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली. राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण 36 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्ह्यातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसही 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.