लांजा : येथे काही दिवसापूर्वी गवा रेड्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आता तरी वनविभाग अधिकाऱ्यांना जाग येईल का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

लांजमधील माचाळ येथील शेतकरी भिकाजी राघू मांडवकर (वय ६५) हे ९ ऑक्टोबर रोजी आपल्या शेतात दुपारच्या वेळेस काम करताना गवा रेड्याने अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात मांडवकरांच्या पोटात गवा रेड्याने शिंगे खुपसल्याने आतडे बाहेर आले होते. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र लांजा येथे प्रथमोपचार करून त्यांना अत्यवस्थ अवस्थेत पुढील उपचाराकरिता रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, मांडवकर यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. १७ ऑक्टोबर पर्यंत त्यांची तब्बेत स्थिर होती. त्यानंतर त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याचा सुमारास त्यांचा उपचारावेळी दुर्दैवी मृत्यु झाला. हल्ल्यात मृत झालेल्या भिकाजी मांडवकर यांच्या कुटुंबियांना लवकरच शासकीय सानुग्रह अनुदान देण्यात येईल असे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी सांगितले.

गव्याच्या हल्ल्यातील मृत्यूची दुसरी घटना

जुलै महिन्यात देखील चिपळूण तालुक्यातील ३५ वर्षीय तरुणावर गव्याने जोरदार हल्ला चढवल्याची घटना घडली होती. फुरूस येथील जंगलात गुरे चरवण्यासाठी गेलेल्या सतीश जाधव या तरुणावर गव्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. गव्याचा हल्ला इतका जोरदार होता की, गव्याची शिंगे सतीश जाधव याच्या पोटात घुसली होती. अनेक ठिकाणी मोठ्या जखमा झाल्या होत्या. सतीश अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल होताच तातडीने शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. मात्र शस्त्रक्रिया करून कोणताही उपयोग झाला नाही. अखेर सतीशचा डेरवण रुग्णायलातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 

ठोस उपाययोजना करण्याची गरज

जिल्ह्यात गव्याच्या दोन घटना घडून सुद्धा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात वनअधिकारी अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. जंगलमय भागातील प्राणी भरवस्तीत येत असतात. प्राण्यांची कल्पना स्थानिक नागरिकांकडून वनविभागाला दिली जात असते. मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांचे घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असतें. वन्य प्राण्यांचा भरवस्तीत मुक्त संचार रोखण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तरच अशा जीवघेण्या हल्ल्याचे प्रकार कमी होण्यास मदत होईल.