संगमेश्वर : तालुक्यातील सांगवे गावातील अनंत आत्माराम शेलार यांच्या जागेतील लाखो रुपयांची जवळ जवळ ऐंशीच्यावर खैराची झाडे परस्पर तोडून नेल्याची घटना गेल्या फेब्रुवारी महिन्यात घडली होती.

जागामालक शेलार आणि इतर हिस्सेदार यांनी देवरूखचे वनपाल (वनविभाग ) यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. वनखात्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि या प्रकरणाची पुढे चौकशी केली. यात सांगवेसह कोसुंबमधील ५ जणांनी याची कबुली दिली. महाराष्ट्र झाडे तोडण्याचा अधिनियम १९६४ व सुधारणा १९८९ चा अधिनियम क्र. २६ कलम ३ चा भंग झाला असुन कलम ४ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

देवरुख वनविभागाच्या वनपालांना संबंधीतांकडून दंड वसुली करून जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदारांच्या ताब्यात देऊन अहवाल सादर करण्याचा आदेश वनपरिक्षेत्र अधिकारी, रत्नागिरी यांनी दिला आहे. वनविभागाने केलेल्या या कारवाईवर तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले असून यापुढे गरज वाटल्यास पोलीस तक्रार करून दिवाणी खटला दाखल करण्यात येईल, असे यावेळी बोलताना सांगितले.