दिवाळी सणाच्या तोंडावर अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्हाभरात सातत्याने येत असलेल्या पावसाने शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सणासुदीच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे.

पावसामुळे शेतातील सोयाबीनच्या मुळ्यासुद्धा सडून गेल्या आहेत, तसेच दाण्यांना कोंब फुटत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यास सुरुवात केली, त्यांना पावसामुळे गोळा करणे अशक्य झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक असलेले पीकच शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेले आहे. सोयाबीन सोबतच ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, मूग, उडीद ही पिके देखील सततच्या पावसामुळे नष्ट झाली आहेत.

सदरची परिस्थिती मांडून परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी व विमा कंपन्यांना 100% मदत करण्याचे आदेशीत करावे, अशा मागणीचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात तसेच  मा.आ.विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.