रत्नागिरी : लांजा येथून सुटलेल्या एसटी बसला पावस येथील उतारात ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान झाला. या रस्त्याच्या कडेलाच लागून दोन घरे असून, सुदैवाने गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झाडावर अडकून राहिल्याने मोठा अनर्थ टळला.
लांजा - रत्नागिरी (एमएच ४०, एन ९८४१) ही गाडी लांजा आगारातून सात विद्यार्थ्यांसह ९ प्रवाशांना घेऊन सकाळी १०.३० वाजता सुटली. धोपटवाडी येथील शाळेची सात मुले दुपारच्या सत्रासाठी पावस शाळेत येत होती. ही गाडी देवधे मार्गे पावस येथे येत असताना पावस येथील उतारात हा अपघात झाला. एसटी बसच्या समोर दोन रिक्षा आणि एक डंपर जात होता. या वाहनांना वाचविण्यासाठी बस चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला एका बांधाच्या सहाय्याने थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडी कलंडली आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झाडावर अडकली. या रस्त्याच्या कडेलाच दोन घरे असून या घरांवर ही गाडी कोसळता कोसळता वाचली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.