डेरवण : महाराष्ट्र संघाच्या मुलींनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत अंतिम फेरीत तमिळनाडू संघाचा १८ विरुद्ध ० गुणांनी दारुण पराभव करीत तर मिश्र गटात महाराष्ट्र संघाने मुलांच्या गटातील पराभवाचा वचपा काढीत उत्तर प्रदेश संघाचा एकतर्फी सामन्यात पराभव करीत ७ व्या सब जूनियर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत दुहेरी विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटात उत्तर प्रदेश संघ अव्वल स्थानी राहिला कर्नाटक दुसऱ्या तर छत्तीसगड संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
डेरवण( रत्नागिरी) येथील एस व्ही जे सी टी च्या क्रीडांगणावर १३ ते १६ ऑक्टोंबर या कालावधीत डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन आणि रत्नागिरी डॉजबॉल संघटना यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत मुलांच्या गटात २३ तर मुलींच्या गटात २० संघातील एकूण ५२० खेळाडूनी सहभाग घेतला होता.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत उत्तर प्रदेश विरुद्ध कर्नाटक असा चुरशीचा सामना झाला. यात उत्तर प्रदेश संघाने १५ विरुद्ध १२ अशा केवळ ३ गुणांनी विजय प्राप्त करीत विजेतेपद पटकावले. छत्तीसगड संघाने तिसरे स्थान प्राप्त केले. गटात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्र संघाला मात्र उप उपांत्य फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला.
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रातील प्रज्ञा व स्नेहा माने,नीलू चव्हाण यांच्या जबरदस्त खेळीच्या बळावर संघाने तमिळनाडू संघावर १८ गुणांनी विजय साजरा केला. मिश्र गटात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय स्थान पटकाविले.
बक्षीस वितरण डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी पी.एस, बरार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र डॉजबॉल संघटनेचे सचिव प्राचार्य डॉ. हनुमंतराव लुंगे,उपाध्यक्ष राजेश जाधव, फेडरेशन चे उपाध्यक्ष मनोज खरब, निरीक्षक ख़्वाजा अहमद,एस व्ही जे सी टी चे मानद सदस्य विवेक सरस्वते,डॉ. जितेन्द्र सप्रे, गुरवीरसिंग शाही आदि उपस्थित होते. विजयी संघाला अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकासह आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.
संचालन प्रा. हरीश काळे यांनी केले तर आभार रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव उदय कळंबे यांनी मानले.