संगमेश्वर : मुंबई - गोवा महामार्गावरील कोळंबे येथील वळणावर बोलेरो चालकाने विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. या धडकेत दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या वयोवृध्दला गंभीर दुखापत झाली. मात्र अपघातानंतर बोलेरो चालकाने पलायन केले. त्याला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी साखरपा मूर्शी येथील चेक पोस्ट वर अडवले. ही घटना रविवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो चालकाने कोळंबे येथे रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला विरूद्ध दिशेला जाऊन जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार संकेत परशुराम पंडित (26, सोनगिरी) हा किरकोळ जखमी झाला. तर त्याच्या मागे बसलेले राजाराम पंडित (60, सोनगिरी) असे दोघेजण जखमी झाले. राजाराम त्यांच्या हाताला पायाला जबर मार बसला होता. अपघातानंतर स्थानिकांनी या ठिकाणी गर्दी केली. मात्र बोलेरो चालक धडक देऊन फरार झाला होता. रस्त्यावर पडलेल्या त्या जखमी वृद्धला लगेचच रत्नागिरी येथे हलवण्यात आले. या अपघाताची माहिती ग्रामस्थांनी संगमेश्वर पोलिसाना देण्यात आली. त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लगेचच नाकाबंदी केली. मात्र हा बोलेरो चालक मुर्शीच्या दिशेने जात असल्याची पोलिसाना माहिती मिळाली. पोलिसांनी मुर्शी नाका येथे बोलेरो चालकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर संगमेश्वर पोलिस स्थानकात भादविकलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184, 134 (ब), 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताची खबर दुचाकीस्वार संकेत पंडित याने संगमेश्वर पोलिस स्थानकात दिली. आपली तक्रार संगमेश्वर पोलिसांनी उशिरा नोंदवली असे त्याचे म्हणणे आहे. सायंकाळच्या सुमारास त्याची तक्रार घेण्यात आली. सकाळी घडलेली घटना आणि तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसाना एवढा वेळ का लागला. असा ग्रामस्थांचा आरोप आहे.