शिरुर: लंडन येथील आंबेडकर हाऊस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असुन अत्यंत बुध्दीवादी अर्थतज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ तसेच समाजसुधारक असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या घराला भेट दिल्यानंतर समजते की अधुनिक भारताचे निर्माते डॉ. आंबेडकर आहेत का आहेत. भारतातून लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने या हाऊसला भेट दिलीच पाहिजे. कारण शिक्षण कसे करावे हे समजून घ्यायचे असेल तर आंबेडकर हाऊस एक मुर्तीमंत उदाहरण आहे असे मत जनता दल युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष ॲड संग्राम शेवाळे यांनी लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेटदिल्यानंतर व्यक्त केले.

संग्राम शेवाळे यांनी नुकतीच लंडन येथील आंबेडकर हाऊस ऑफ लंडनला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधान पुरुष असुन त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य गरीब, अस्पृश्य लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वेचले. ज्यावेळी लंडनमधील डॉ. आंबेडकर यांच्या घराजवळ आपण पोहचलो, त्यावेळी अंगावर शहारे आले, छाती अभिमानाने भरून आली. सन १९२१,२१ या एक वर्षाच्या कालावधीत डॉ. आंबेडकर यांनी या ठिकाणी वास्तव्य केले. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पीएचडी पदव्या मिळविल्या. कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.

पुढे बोलताना शेवाळे म्हणाले, आंबेडकर हाऊसमध्ये प्रवेश करताच डॉ. आंबेडकर यांचा पुतळा निदर्शनास आला. तेथे अभिवादन केल्यानंतर आजही जपलेले चष्मा, पेन, पत्रव्यवहार, महत्वाचे फोटो हे पहावयास मिळाले. तेथे एक वेगळीच उर्जा जाणवली. संग्राम शेवाळे हे लंडन या ठिकाणी क्वीन मेरी या संस्थेत न्याय व विधीचे शिक्षण घेत आहेत. भारतात येउन गरीब, वंचित लोकांसाठी काम करण्याची उर्जा या भेटीतून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.