कन्नड: शहरातील उपक्रमशील साने गुरुजी विद्यालयात 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती कन्नड' शाखेतर्फे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात मुले- मुली ,माणसे फटाके फोडतात, पैशाची राख -रांगोळी करतात, पैशाचा धूर करतात हे सर्व मानवाच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. हे सर्व टाळून या पैशाचा सदुपयोग आपण आपल्या ज्ञानार्जनासाठी करावा असे आवाहन साने गुरुजी शिक्षण संस्थेचे सचिव टी एस कदम यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या कशा घालवाव्या, तसेच दिवाळी साजरी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन मुख्याध्यापक भगवान ठाकरे यांनी केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सभासद महादेव गुंजरगे यांनी फटाक्याव्यतिरिक्त धूर न होता फक्त आवाज व्हावा व दिवाळी साजरी व्हावी ,यासाठी फुगे फुगवून ते फोडावे व दिवाळी साजरी करावी असा एक नवीन उपक्रम यावेळी विद्यार्थ्यांना दिला.या 'फटाके मुक्त दिवाळी अभियान-२०२२' या अभियानाचे सौजन्य संतोष कोल्हे मित्र मंडळ, तसेच नगरसेवक संतोष निकम मिस्तरी यांनी घेतले होते.  यावेळी व्यासपीठावर कन्नड शहराचे विद्यमान नगरसेवक संतोष निकम (मिस्तरी), सौ.अनिता कवडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.मिलिंद पाटील, सचिव टी एस कदम, मुख्याध्यापक भगवान ठाकरे, अ.नि.स कन्नड चे तालुका अध्यक्ष शिवाजी बोरसे, श्रीमती आशा महाजन, श्रीमती मंगल कदम, महादेव गुंजरगे आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्रीराम जाधव यांनी केले, तर आभार मंगेश गायकवाड यांनी मानले.