गुहागर : तालुक्यातील भेलेवाडी तळवली येथे शुल्लक कारणावरुन एका महिलेला तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत तिघांविरोधात महिलेने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत धोंडू किंजळे, सुविधा शशिकांत किंजळे, मयुरी चंद्रकांत किंजळे (सर्व. भेलेवाडी तळवली, गुहागर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद गुलाब पांडुरंग किंजळे (४०, भेलेवाडी, तळवली) यांनी पोलीस स्थानकात दिली. ही घटना १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब किंजळे आणि वरील तिघेजण हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. गुलाब किंजळे या कायमस्वरूपी माहेरी येवून राहिलेल्या असल्याने वरील तिघेजण आणि गुलाब यांच्यातही वाद आहे. १५ ऑक्टोबर रोजी शशिकांत, सुविधा आणि मयुरी किंजळे हे तिघेजण टीव्हीचे केबलचे काम करीत असताना केबलची वायर ही गुलाब किंजळे यांच्या घरावरील वायरला जोडत होते. याविषयी गुलाब यांनी शशिकांत यांना विचारणा केली. याचा राग मनात धरून शशिकांत व इतर दोघांनी गुलाब यांना शिवीगाळ करत धकलाबुकल करून डोक्यात काठीने मारुन दुखापत केली. यामध्ये गुलाब या जखमी झाल्या. त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शशिकांत किंजळे, सुविधा किंजळे, मयुरी किंजळे यांच्यावर भादविकलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.