शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पुर्वसुचना पिक विमा कंपनीला  

    कळवावी.

परभणी,दि.16(प्रतिनिधी) : माहे ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील काही महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टी व काही महसूल मंडळामध्ये सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे. शेतात सखल भागात पाणी साचल्याने पीक वाया गेले आहे. त्यामुळे संपूर्ण महसूल विभाग, कृषी विभाग यांनी तात्काळ जायमोक्यावर जाऊन पिकांचे पंचनामे करण्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आदेश दिले आहेत.

तसेच पंचनाम्यांच्या प्रक्रियेतून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये याचीही दक्षता घेण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना दिल्या आहेत. त्यानुसार महसूल विभाग व कृषी विभाग यांनी समन्वयाने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात केली आहे.पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास पुर्वसुचना देण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. सावंत यांनी केले आहे. 

सद्यस्थितीत सोयाबीन पिकाची काढणीस सुरूवात झाली आहे. तसेच तुर व कपाशी शेतात वाढीच्या अवस्थेत आहे. या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अधिसुचित पिकांबाबत नुकसान भरपाई लागू आहे. त्याबाबतचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या अधिसूचित पिकाचे नूकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते. काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत जास्तीत-जास्त 14 दिवस ( काढून ठेवल्यापासून दोन आठवड्यापर्यंत ) गारपीट, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल.

जिल्ह्यामध्ये पिक विमाधारक शेतकऱ्यांचे सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत customersupport@icicilombard.com या ई-मेलवर आयडीवर, https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central क्रॉप इन्शुरन्स अॅपवर किंवा 180010377123 टोल फ्री क्रमांकावर वर कॉल करुन आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पुर्वसुचना पिक विमा कंपनीला कळवणे बंधनकारक आहे.  

अथवा ऑनलाईन पद्धतीने पुर्वसुचना देण्यास अडचणी येत असल्यास ऑफलाईन पध्दतीने पीक विमा कंपनीचे जिल्हा व तालुका कार्यालयात तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे लेखी स्वरूपात पुर्वसुचना नोंदविण्यात यावी असे आवाहन ही पालकमंत्री तानाजी सावंत व जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यांनी केले आहे