दापोली : दापोली व्रीडा मंडळाचा खेळाडू आधारस्तंभ, दापोली वुणबी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक, व्यावसायिक, दापोली काँग्रेसचे पदाधिकारी, काळकाई कोंड दापोली येथे वास्तव्यास असणारे दापोलीकरांना सुपरिचित असणारे कै. संजय वाडकर यांचे हृदयविकाराने काल दि. १४ ऑक्टोबर रोजी रात्री निधन झाले. संजय वाडकर हे दापोली क्रीडा मंडळाच्या ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार होते. रत्नागिरी जिल्हा असोसिएशनने आयोजित केलेल्या लेदर बॉल टुर्नामेंटमध्ये अंतिम विजेता संघाचे सदस्य होते. दापोली क्रीडा मंडळाची स्मरणात राहणारी कामगिरी असून टेनिस क्रिकेटमध्ये नवशक्ती संघाकडून खेळणारे संजय वाडकर अतिशय जिद्दीने लेदरबॉल संघाच्या सरावासाठी सकाळी न चुकता हजर राहायचे. दापोली क्रीडा मंडळाच्या संघात निवड व्हावी म्हणून अतिशय मेहनतीने त्यांनी स्वतःला सिध्द केले.

लेगस्पिनर गोलंदाज म्हणून त्यांनी संघात स्थान मिळविलं. गोलंदाजी करताना स्वतःशीच बोलून स्वतःला मोटिव्ह करायचे. त्याच्या लेगब्रेकने अतिशय महत्वाच्या विवेट्स त्याने स्वतःशीच पुटपुटत घेऊन संघाच्या अंतिम विजयासाठी मोलाची कामगिरी केली होती. अतिशय दणकट शरीरयष्टी, पण तितकाच सगळ्यांना आपल्या विनोदी स्वभावाने जिंकणारे संजय वाडकर दापोलीकरांमध्ये लोकप्रिय होते.

दापोली नगर पंचायतीच्या स्थापनेनतरच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवून ते निवडून आले. काँग्रेस विचार धारेशी ते कायम एकनिष्ठ राहिले. चिरेखाण व्यावसायिक म्हणून ते प्रसिध्द होते. त्यांचा विविध पक्षाबरोबरच दापोलीत मोठा मित्रमेळा होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने दापोलीत दुख व्यक्त केले जात आहे.