राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगोला पथकाने 8 सप्टेंबर रोजी शहरात एका कारमधून देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. सदर गुन्ह्यात तीन लाख 28 हजार 920 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 31 ऑगस्ट पासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतूकी विरोधात सामूहिक मोहीम राबविण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सांगोला कैलास छत्रे यांनी त्यांचे पथकासह सांगोला शहरात दुपारी 4 वाजताच्या सुमारास गस्त घालत असताना सांगोला मिरज रोडवर त्यांना एका मारुती स्विफ्ट कार जिचा क्रमांक एम एच 12 डी एम 57 52 संशयितपणे जात असल्याचे दिसून आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात देशी विदेशी दारुचा साठा आढळून आला. देशी-विदेशी दारुच्या साठ्यामध्ये 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 144 सिलबंद बाटल्या व विदेशी दारूचे 144 सिलबंद बाटल्या अशी रुपये 1 लाख 28 हजार 920 रुपये दारू व कार असा एकूण तीन लाख 28 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला आहे. तसेच कारचा चालक हणमंत शामराव खरात, वय 41 वर्षे, राहणार नाझरे तालुका सांगोला याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर कारवाई दुय्यम निरीक्षक सांगोला कैलास छत्रे व जवान तानाजी काळे यांच्या पथकाने केली.