राजापूर : जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आमदार डॉ. राजन साळवी यांच्या मुंबई- गोवा महामार्गावरील वाटूळ येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पंचक्रोशी ग्रामविकास समिति केलेल्या मागणीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यात राज्य शासनाचे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, यासाठी आमदार डॉ. राजन साळवी यांनी सातत्याने तत्कालीन आरोग्यमंत्री व सार्वजनीक बांधकाम मंत्री यांच्याकडे अनेक वेळा प्रयत्न केले असून त्या प्रयत्नांना यश येऊन त्यानुषंगाने वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ५ एकर जागा देण्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय होण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु प्रत्येक विभागामध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटला मंजुरी मिळत असून त्यानुषंगाने कोकण विभागामध्ये यापूर्वी ठाणे जिल्ह्यात मंजुरी मिळाली असल्याने त्याऐवजी वाटूळ येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या अनुषंगाने सूचित केले होते. त्या अनुषंगाने मौजे वाटूळ येथे सदर जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणेसाठी सुधारित प्रस्ताव उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर यांना सादर केला आहे.
अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता
मुख्य अभियंता, सा. बां. प्रादेशिक विभाग, कोकण यांचे कार्यालयाकडून त्याच्या बांधकामाकरिता रु.६२.८७.३०,१५६/- इतके अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध होणेकरिता २.५.२०२२ अन्वये उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे. जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सदर सकारात्मक निर्णयामुळे राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.