रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रशस्त अशा १० मजली मध्यवर्ती इमारतीसाठी ९२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे रत्नागिरी शहराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. मंत्रालयाकडून याबाबतचे मंजुरीसाठीचे पत्र अवर सचिव सचिन चिवटे यांनी नुकतेच पारीत केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय आता १० मजली इमारतीत उभे राहणार असून त्यामध्ये विविध मजल्यांवर विविध विभागांना सामावून घेतले जाणार आहे. तसेच या इमारतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे पावसाचे पडणारे पाणी संकलन करणे, अपंगांसाठी विशेष सुविधा, कार्यालयात येण्यासाठी अंतर्गत रस्ते, जिल्ह्यातून येणाऱ्या जनतेला तसेच प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पार्कींगची व्यवस्था, अद्ययावत अशी ड्रेनेज सुविधा, संपूर्ण इमारत एअर कंडीशन करतानाच अत्याधुनिक वेगवान लिफ्ट बसविली जाणार आहे.

या संपूर्ण परिसराची सुरक्षितता राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अधिकाऱ्यांचे विविध कक्ष स्थापन केले जाणार आहेत. कोकणचे सुपुत्र तसेच केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याची आणि तेथील शासकीय इमारतींची केलेली रचना सर्वांना भावते.

तशीच इमारत याठिकाणी राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी तयार करण्याचा संकल्प केला आहे. त्याला नुकतीच मान्यता मिळाली असून त्याचा अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाणार आहे. त्यासाठी १० प्रकारची कागदपत्रे पूर्ण करावी लागणार आहेत.