लांजा : शहरातील बँक ऑफ इंडिया लांजा शाखेची सिस्टम हॅक करून परस्पर पैसे लंपास करण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुका व्यापारी संघटनेच्यावतीने बँकेला, खातेदारांच्या सुरक्षितते संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

लांजा तालुका व्यापारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांजा शहरातील व तालुक्यातील बहुसंख्य व्यापारी बँक ऑफ इंडिया या अग्रणी बँकेचे खातेदार तसेच कर्जदारही आहेत. सायबर गुन्हेगारांमार्फत यश कन्स्ट्रक्शन फर्मच्या सुधीर भिंगार्डे यांच्या सीसी बँक खात्यातील ९२ लाख ५० हजार रूपयांची रक्कम सायबर गुन्हेगारांमार्फत ऑनलाईन फसवणूक करून लंपास करण्यात आली. भिंगार्डे यांनी आपल्या खात्यासंबंधी कोणतीही गुप्त माहिती दिली नसताना देखील त्यांची सायबर गुन्हेगारांमार्फत फसवणूक झाली असून हडप केलेली रक्कम पूर्ववत मिळेपर्यंत त्यांना बँकेकडून व्याजाची आकारणी करण्यात येऊ नये. तसेच या फसवणूक झालेल्या रक्कमेबाबत सर्वस्वी जबाबदारी बँकेने घ्यावी. सायबर क्राईमची जी घटना घडली आहे त्याविषयी बँक ऑफ इंडिया लांजा शाखा, झोनल कार्यालय मुख्य कार्यालय यांच्याकडून संबंधित यश कन्स्ट्रक्शन फर्मला लागेल ते सहकार्य करण्याची मागणी व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, व्यापारी संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनावर बँकेच्या शाखा अधिकारी यांनी या प्रकरणात तपास सुरु असून आमचे सर्व सहकार्य आपणाला असणार आहे अशी ग्वाही दिली. शिवाय संघटनेच्यावतीने सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांपासून खातेदारांच्या सुरक्षितते संदर्भात बँकेच्या प्रशासकीय यंत्रणेला स्वतंत्र निवेदन देखील देण्यात आले आहे. याबाबतीत कोणत्याही आकर्षक योजनांच्या अमिषाला बळी न पडता ऑनलाईन व्यवहार करताना सर्व नागरिकांना व व्यापारी वर्गाला काळजी घेण्याचे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांच्यावतीने करण्यात आले आहे.