रत्नागिरी : तालुक्यातील चाफेतील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात सामाजिक शास्त्र मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले आणि महाविद्यालयच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा पालये यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. व दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्राचार्या स्नेहा पालये म्हणाल्या, भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर 1931 हा जन्मदिन. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस शाळा महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाइल इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत चालले आहे. वाचनामुळे आपल्याला इतिहासाचे ज्ञान, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेता येतो. ज्ञान मिळवण्याचा प्रभावी माध्यम म्हणजे वाचन आहे, असे त्यांनी सांगितले.

यासोबत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जीवन सार मांडण्यासाठी प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुरुवातीचे जीवन कालखंड, शास्त्रज्ञ म्हणून कारकिर्दी, राष्ट्रपती बनण्याचा कालखंड, निवृत्तीचा कालखंड, त्यांनी लिहिलेली पुस्तके इत्यादी घटनांची सांगड आपल्या मनोगत व्यक्त केली. दरम्यान विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने समाज शास्त्र विभागाकडून ग्रंथप्रदर्शन देखील करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आवडीचे पुस्तक घेऊन त्याचे परीक्षण केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा पालये, सामाजिक शास्त्र विभाग मंडळ प्रमुख प्रा. कविता जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. अवनी नागले, प्रा. राजेश धावडे,प्रा. शामल करंडे, प्रा. तेजश्री रेवाळे, व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत गोताड व प्रास्ताविक सामाजिक विभाग प्रमुख कविता जाधव यांनी केले.