औरंगाबाद:एका भामटयाने मुलाच्या खात्यावर पैसे आल्याची खोटी बतावणी करत एका दुकानाजवळ नेवून एका वृद्ध महिलेचे दागिणे लुटल्याची घटना शुक्रवारी दि.१४ रोजी भर दुपारी वडगाव कोल्हाटी येथे घडली.या विषयी मिळालेली माहिती अशी की, रुख्मिनबाई त्र्यंबक साळे ६५,रा. मारोती मंदिराजवळ वडगाव कोल्हाटी ह्या शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास आराध्या साळे या नातीला योगेश्वरी शाळेजवळ शिकवणीला सोडून घरी येत होत्या. घरी परत येत असताना त्यांना वाटेतच दुचाकीवर अंगात चॉकलेटी रंगाचे टि शर्ट, डोक्यावर टोपी घातलेला अनोळखी व्यक्ती भेटली. सदर व्यक्तीने दुचाकी उभी करुन रुख्मिनबाई यांना हटकत आई तुमचा मुलगा रुषिकेश याच्या अकाउंटवर पैसे आले आहेत. तुमचा फोटो काढावयाचा आहे. तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणून रुख्मिनबाई यांना दुचाकीवर बसवून वडगावगावतील लोकशाहीर आण्णा भाउ साठे चौकात नेले. चौकातील गायत्री बुटीक दुकानासमोर उभे करुन तुमचा फोटो काढावयाचा आहे असे म्हणत अंगावरील सोन्याचे दागिणे काढून बाजूला ठेवण्यास सांगितले. रुख्मिनबाई यांना काही सूचत नसल्याने त्यांनी अंगावरील सोन्याचे साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, १ तोळा सोन्याचे १० मनी व १ डोरलं, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची नाकातील नथ व ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील फुले काढून बाजूला ठेवले. विशेष म्हणजे हे सर्व सोन्याचे दागिणे ठेवण्यासाठी स्वतःजवळील प्लॅस्टिकची दिली. रुख्मिनबाई यांनी सर्व दागिणे बॅगमध्ये ठेवताच सदरील भामट्याने तुमच्या मुलाचे अकाउंटवर आलेले पैसे काढून आनतो व या सोन्याचे वजनही करुन येतो अशी थाप मारुन तो तेथून दुचाकीवर निघून गेला. रुख्मिनबाई बराचवेळ तिथेच त्या व्यक्तीची वाट पहात थांबल्या मात्र तो काही आला नाही. आपली फसवणूक करुन दागिणे लुटल्याचे लक्षात येताच त्यांनी घर गाठून घडलेला सर्व प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितला. शनिवारी दि.१५ वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून पोलीसांना सर्व हकीकत सांगून त्या व्यक्तीविरुदध तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले हे करित आहेत