रत्नागिरी: आ. वैभव नाईक, राजन साळवी हे मातोश्रीचे प्रामाणिक शिलेदार आहेत. निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते यांच्या खोक्याला बळी पडले नाहीत. त्यांनी निष्ठा, श्रद्धा जपली आणि खाल्ल्या मिठाला ते जागले आहेत. खोक्याला दबले नाहीत म्हणून कोणत्या ना कोणत्या एजन्सीचा दबाव टाकायचा. 2002 पासूनचे व्यवहार तपासायचे, कटकारस्थान करायचे हे अत्यंत घाणेरड राजकारण आहे, असे मत रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी खासदार विनायक राऊत शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, असे तुम्ही कितीही एसीबी, एलसीबी, सीबीआय, ईडी लावा तरीही वैभव नाईक आणि राजन साळवी हे दबावाला बळी पडणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले. आ. वैभव नाईक यांच्यावरील कारवाईने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आ. नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे 18 ऑक्टोबर रोजी शिवसैनिकांनी एसीबीच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दक्षिण मुंबईची जबाबदारी दिली आहे, त्यावर खासदार राऊत म्हणाले की, ज्यांनी जबाबदारी दिली त्यांचे मी आभार मानतो. नारायण राणे आणि पनवती हे समीकरण यापूर्वी मुंबई, सिंधुदुर्गात दिसून आली आहे. पुन्हा दिसेल. यावेळी एकटल्यालाच नको बापाबरोबर दोन्ही बेट्यांनाही घ्या, असे खोचक वक्तव्यही केले.
शिवसेना ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित आहे. सध्या महापालिकेचे प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या इशारावर चालत असून त्यांना न्यायालयाचा दणका बसल्यानंतर ते पुढील निर्णय घेत असल्याचेही खा. राऊत यांनी सांगितले. यावेळी आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेससोबत राष्ट्रवादीनेही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला आहे. त्यांचा विषय निश्चित आहे.महाविकास आघाडीच्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते व खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. न्यायालयाने फटकारल्यानंतर राजिनामा मंजूर करणे हे सरकारी यंत्रणेला अशोभनिय असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.