औरंगाबाद : तंत्रज्ञानाचा वापर करत शासकीय योजनांचा लाभ सामान्यांना मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल . तसेच पैठणी , हिमरू शाल , बिद्री कलेच्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करू , असे आश्वासन नूतन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर दिले . पत्रकारांशी बोलताना पांडेय म्हणाले , शेतकरी सन्मान निधी , पीक विमा आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी , पावसाने नुकसानीची भरपाई मिळवून देण्यास प्राधान्य असेल . शेतकरी आत्महत्या रोखण्याबरोबरच पर्यटन विकासासाठीही आपण प्रयत्नशील राहू . यापूर्वी मी मनपात असताना पाणीपुरवठा योजनेवर काम केले आहे . आता विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे काम सुरू आहे . जिल्हाधिकारी म्हणून मीही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करणार आहे . मेट्रो , सातारा देवळाई ड्रेनेजची कामही पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे . स्मार्ट सिटीअंतर्गत कामे , खाम व सुखना नदीचे पुनरुज्जीवन , पैठणच्या उद्यानाचा विकास या कामावर आपला भर असल्याचे पांडेय म्हणाले