चिपळूण : तालुक्यातील खेर्डी बाजारपेठ येथे लेडिज ब्युटी पार्लरमधून मोबाईलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद सल्पेश संतोष दाते (31, खेर्डी, कातळवाडी, चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात दिली. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्पेश दाते यांच्या पत्नीचे खेर्डी बाजारपेठ टेरव येथे लेडीज ब्युटी पार्लर आहे. येथे एका मुलीचे केस कापत असताना त्यांनी बेडवर मोबाईल ठेवला होता. मात्र त्यांचे लक्ष नाही याची संधी साधत अज्ञाताने ब्युटी पार्लरचे बेडवर ठेवलेला 10 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनी मोबाईल चोरुन नेला. सल्पेश यांच्या पत्नीच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईलची शोधाशोध केली. मात्र सापडून आला नाही. त्यानंतर सल्पेश यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. अज्ञातावर भादविकलम 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.