औरंगाबाद : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून कोळीबोडखा ( ता . पैठण ) येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने घरात विष घेऊन आत्महत्या केली . ही घटना शुक्रवारी ( १४ ऑक्टोबर ) मध्यरात्री दीडच्या वाजेच्या सुमारास उघडकीस आली . शेख नबी भिकन ( ५५ , रा . कोळीबोडखा ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे . शेख यांची कोळीबोडखा शिवारात गावालगतच शेतजमीन आहे . परंतु , सतत नापिकीमुळे त्यांना कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले . यातच बँक ऑफ महाराष्ट्रचे एक लाख ४० हजार रुपये , तर हातउसने एक लाख रुपये असलेले कर्ज आता कसे फेडायचे या चिंतेत ते होते , असे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे . शेख नबी यांनी विष घेतल्याचे त्यांच्या मुलाच्या लक्षात आले . त्यांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . डॉ . साबळे , अधिपरिचारिका निशा खाडे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथे हलवले . परंतु , पहाटेच्या सुमारास शेख नबी यांची प्राणज्योत मालवली