रत्नागिरी : कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांतून रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचे वरिष्ठ लिपीक सुनील डांगे यांना शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. बेळगावच्या धर्मनाथ भवन येथे गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, आमदार नीलेश लंके, खासदार, महापौर आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले.

श्री. डांगे यांनी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमध्ये १८ वर्षे, शिरगावच्या (कै.) वा. ग. नेने हायस्कूल येथे ६ वर्षे काम केले आहे. गेली १८ वर्षे ते परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात वरिष्ठ लिपीक आहेत. शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापन समिती मंडळावर १५ वर्षे कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव म्हणून १० वर्षे कार्यरत असून शिक्षकांचे प्रश्न सोडविणे, वेळप्रसंगी उपोषण, धरणे आंदोलनात सहभाग घेतला. श्रीदेवी रांभोळकरीण मंडळ या सामाजिक संस्थेचे ५ वर्षे अध्यक्ष आहेत. या माध्यमातून गरीब मुलांना वह्या, पुस्तकांचे वाटप, महिला सबलीकरण कार्यक्रम, महिलांना मार्गदर्शन व उपक्रम राबवतात. हातखंबा डांगेवाडी येथील स्वयंभू जंबुकेश्वर देवस्थान कमिटीचे ते ३० वर्षे अध्यक्षपद भूषवले आहे. या माध्यमातून विधवा महिलांना शिवणयंत्र, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत, मुलींना प्रशिक्षणसाठी सहकार्य अशी सामाजिक कार्ये केली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल संस्थाध्यक्ष ॲड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष ॲड. सुमिता भावे यांच्यासह मुख्याध्यापक विनोद नारकर, शाळा व्यवस्थापक दिलीप भातडे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री. डांगे यांचे अभिनंदन केले.