जिंतूर/ प्रतिनिधी 

जिंतूर तालुक्यातील बेलखेडा व डोनवाडा येथील 50 ते 60 विद्यार्थिनी दररोज शिक्षणासाठी जिंतूर येथे येत असतात.मात्र या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी गावातून पाटीपर्यंत चार किलोमीटर पायी चालत जावे लागते. तसेच तालुक्यातील चारठाणा, जांब, हंडी येथून येणाऱ्या मानव विकासच्या बस खचाखच भरून येतात, त्यामुळे डोनवाडा व बेलखेडा येथील विद्यार्थिनींना बसमध्ये बसण्यासाठी जागा राहत नाही.

त्याचबरोबर अनेक वेळा पाटीवर बस थांबत नसल्याने, विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे या विद्यार्थिनींना नाईलाजाने खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

या बाबीकडे गंभीरपणे लक्ष देऊन जिंतूर ते बेलखेडा अशी स्वतंत्र्य मानव विकासची बस सुरू करण्यात यावी अशी मागणी बेलखेडा व डोनवाडा ग्रामस्थांच्या वतीने जिंतूर आगार व्यवस्थापक यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनावर सोपान पालवे,अरूण आघाव,धुराजी सानप,मुंजा बुचके,भगवान खंदारे,भारत काळे,सोपान घुगे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.