चिपळूण : कुंभार्ली घाटात अज्ञात वाहनाने गायींच्या कळपाला धडक दिली. या अपघातात तीन गायी ठार झाल्या तर दोन जखमी झाल्या. अपघातानंतर चालक वाहनासह पळून गेला. या वाहनांचा शोध पोलीस घेत आहेत.

कुंभार्ली घाट परिसरात धनगर समाजाच्या वस्त्या आहेत. या भागातील नागरिक पोफळी, शिरगांव आणि कुंभार्ली घाट माथा येथील दूध संकलन केंद्रात दूध विक्री करून उपजिविका करतात. कुंभार्ली घाट परिसरात भातशेती नाही. त्यामुळे येथील शेतकरी गुरे सोडून देतात. शनिवारी रात्री बमू खरात आणि कोंडीबा शेळके यांनी गुरे सोडली होती. ही गुरे रात्री कुंभार्ली घाटात रस्त्याच्या कडेला बसली होती. कुंभार्ली घाटात सध्या धुक्याचे प्रमाण जास्त आहे. रस्त्याच्या कडेला बसलेली गुरे वाहनचालकाला दिसली नाहीत. त्यामुळे त्याच्या वाहनाने गुरांना धडक दिली. त्यात तीन गायी जागीच ठार झाल्या तर दोन जखमी झाल्या आहेत.