शिरुर: शिरूर तालुक्यात सामान्य माणसाचा त्याच्या दैनंदिन शेतातील कामात त्याला बिबट्याशी करावा लागणारा सामना हा खूप भीतीदायक आहे. शिरूर तालुक्यातील जांबुत या गावी बिबट्याच्या हल्ल्यात त्या 19 वर्षीय मुलीचा झालेला मृत्यू हा खूप हृदयद्रावक आहे. सध्या शिरूर तालुक्यातील बिबट्याचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्याचं जीवन हे खूप संघर्षमय जीवन आहे. रात्रीचे वेळेस त्याला शेतात पिकाला पाणी द्यायला जावं लागतं. सरकार कोणतेही सत्तेत असो ते शेतकऱ्यांच्या मुळावरच बसलेले असते. निवडून येताना शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करून सत्तेत यायचं आणि सत्तेत आल्यावर त्याच शेतकऱ्याच्या पाठीत लाथ द्यायची हि सर्व पक्षाच्या सरकारचे एकंदरीत वर्तन राहिले आहे. सरकार आणि महावितरण हे सगळे शेतकऱ्यांच्याच मुळावर बसलेले आहेत. आपल्या मताचा योग्य उपयोग करून या सगळ्यांना वठणीवर इथला जागृत नागरिकच आणू शकतो.
सध्या शिरूर तालुक्यात बिबट्या आणि लांडगे या दोन प्राण्यांचा वावर खूप वाढला आहे. मला दोन दिवसांपूर्वी बाभूळसर या गावातून एका शेतकऱ्याचा फोन आला होता. थ्री फ्यूजची लाईट रात्रीच्या वेळी असलेमुळे त्यांना रात्री शेतावर पिकाला पाणी द्यायला जावे लागते. अशा वेळेस तिथे लांडग्यांच्या वावर वाढल्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांच्या मनात एक भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. एक दोन लोकांवर तो लांडगा धावुनही गेला होता. त्यांना मी सांगितले होते की तुम्ही सदर प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा त्यांना पकडून नेण्यासाठी तक्रार करू शकता. ज्या ज्या शेतकऱ्यांना रात्री- अपरात्री शेतात पाणी धरायला जावे लागते किंवा ज्या भागात या हिसंक प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेतीची कामे करण्यात अडथळा निर्माण झाला असेल व त्याचबरोबर जिविताचा धोका निर्माण झाला असेल तर अशा सर्व संबंधित भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्या संबंधी तक्रार करावी. सदर तक्रार तुम्ही तहसीलदार यांचेकडे करू शकता. त्याचबरोबर उपविभागीय दंडाधिकारी यांचे कडे सुद्धा करू शकता. या दोघांनीही जर सदर तक्रारी बाबत काही पाऊले उचलली नाहीत तर तुम्ही कोर्टात तक्रार दाखल करू शकता.
शिरूर तालुक्यातील ज्या ज्या भागात अशा हिंसक प्राण्यांचा शेतात वावर वाढल्यामुळे जिविताचा धोका निर्माण झाला आहे त्यांनी विलंब न करता तक्रार दाखल करावी आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे कि त्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या हक्कासाठी लढावे. व्यवस्था जर जागी होत नसेल तर तुम्ही त्यांना जागे करा. थ्री फ्यूजची जी लाईट रात्रीच्या वेळी देतात ती बंद करून दिवसा करून घ्या. प्रत्येक पिक घेताना शेतकऱ्यांना लाईटीच्या या समस्यांना सामोरे जावे लागते. लागवड करतानाच तकतक करून ती लागवड करून घ्यावी लागते. लागवडीला माणसे उपलब्ध असली की लाईट नसते आणि लाईट असली की माणसे मिळत नाही. अशा प्रकारची दुर्दशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महिनाभर शिरूर तालुक्यातील बाजार समित्यांवर बहिष्कार टाकावा. आपल्या शेतातील माल त्यांनी दुसऱ्या तालुक्यात जाऊन विकावा किंवा दुसऱ्या तालुक्यातील व्यापाऱ्याला तिकडे विकण्यासाठी द्यावा. किंवा ज्यांना लागेल ते शेतात येऊन घेऊन जातील. राजकीय लोकांबरोबरच बाकीच्या लोकांना सुद्धा शेतकऱ्यांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्या कळल्या पाहिजेत. महिना पंधरा दिवस त्यांना शेतीमालापासून वंचीत ठेवा आणि फक्त डाळ भात खाऊद्या तेव्हा त्यांना कळेल फक्त शेतीमालच नाही तर शेतकरी सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे काय करावे लागेल ते करा. आणि हे सगळं करण्यासाठी कोणत्या नेत्याचे पाय धरू नका. त्यांना सरळ जाऊन सांगा असं असं झालं पाहिजे आणि नाही झालं तर तुमची मोहीम तुम्हीच ठरवा. सगळ्यात अगोदर या हिंसक प्राण्याचा प्रश्न खूप अतितातडीचा आहे तो मार्गी लावा.
जांबुत येथील त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली😔
©ॲड. वैभव चौधरी
( जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे ) 9970045847