शिरुर: मुलगा अमेरीकेत राहत असल्याने वयस्कर आईच्या देखभालीसाठी तसेच तिला मदत करण्यासाठी एका व्यक्तीची पगारी नेमणूक केली. परंतु आईच्या मृत्यूनंतर घरातील कपाटात ठेवलेले आईचे दागिने तसेच रोख रक्कम मिळुन 3 लाख 66 हजार 840 रुपयांची चोरी केल्याप्रकरणी राकेश कौतुकराव सोनुने आणि त्याची पत्नी अश्विनी राकेश सोनुने (रा. पिंपळगाव ता. भोकरण, जि. जालना) या दोघांविरोधात रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन याबाबत राजेंद्र सुभाष शेटे रा रांजणगाव गणपती ता शिरुर जि पुणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र सुभाष शेटे हे नोकरीनिमित्त टेम्पा, फ्लोरिडा, अमेरिका येथे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. रांजणगाव गणपती येथे त्यांची आई पार्वती सुभाष शेटे ह्या राहत होत्या. परंतु ऑक्टोबर २०२१ रोजी त्या मयत झाल्या आहेत. त्या मयत होण्यापूर्वी त्या घरामध्ये एकट्या राहत असल्याने तसेच त्या वयस्कर असल्याने त्यांची देखभाल व इतर कामात मदत करण्यासाठी राकेश कौतुकराव सोनुने रा.पिंपळगाव, ता. भोकरण, जि. जालना याला सांगितले होते. तो काही दिवस भाडेकरू म्हणून शेटे यांच्या घराशेजारीच राहण्यास होता. तसेच पार्वती शेटे यांना तो प्रामाणिकपणे मदत करत असल्याने शेटे यांचा त्याच्यावर विश्वास बसल्याने त्याला शेटे यांनी खोली भाड्याने राहण्यास दिली होती आणि नोकरीस ठेवले होते.
ऑक्टोबर २०२१ मध्ये पार्वती शेटे ह्या मयत झाल्यानंतर त्यांचा मुलगा राजेंद्र शेटे यांनी आईचे सोन्याचे दागिने तसेच इतर महत्वाच्या वस्तु कपाटामध्ये ठेवलेल्या होत्या. आईच्या मृत्यू नंतरही राजेंद्र शेटे यांनी राकेश सोनुने याला नोकरीवर ठेवत त्याला महिन्याला 8 हजार रुपये पगार देत होते. तसेच त्यांच्या कारेगाव येथे शेटे यांच्या इमारतीचे बांधकाम चालु असल्याने त्या बांधकामास लागणारे साहित्य आणण्यासाठी राकेशला वेळावेळी गरजेप्रमाणे पैसे देत होते. त्या इमारतीचे काम पुर्ण झाले असुन संबंधित ठेकेदाराचे काही पैसे देणे बाकी आहे.
दि १२ सप्टेंबर २०२२ रोजी राजेंद्र शेटे आईचे वर्षश्राद्ध करण्यासाठी अमेरिकातुन रांजणगाव गणपती येथे आले असता राकेश हा त्यांच्या आईच्या घरामध्ये राहत असल्याचे शेटे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबत राकेशला विचारणा केली असता तो घाबरला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राकेश मोनूने हा दुस-या दिवशी त्याचे मुळ गावी जालना येथे त्याचे काही सामान घेवुन त्याची बायको अश्विनी हिला गावी सोडुन येतो असा बहाणा करून गावी निघुन गेला. त्यानंतर दुस-याच दिवशी कारेगाव येथील बिल्डिंगचे काम घेतलेला कॉन्ट्रक्टर शेटे यांच्या घरी आले आणि म्हणाले की, 'पार्वती शेटे यांनी सारस्वत बँकेची इमारत माझ्या नावावर केली आहे असे सांगत राकेशने स्थानिक लोकाकडुन पैशांची उधारी केली आहे. तसेच माझेही कामाचे पैसे थकविले असल्याचे सांगितले. त्यानंतर अनेक लोकांनी राजेंद्र शेटे यांच्याकडे येवुन पैसे मागण्यास सुरवात केली.
त्यानंतर शेटे यांनी राकेश यास फोन केला आणि ताबडतोब रांजणगाव येथे येऊन मला या सगळ्या गोष्टीचा हिशोब दे असे सांगितले. त्यावेळेस राकेशने मी तिकडे येऊन हिशोब देतो असे म्हणत फोन बंद केला परंतु तो आलाच नाही. त्यानंतर शेटे यांना संशय आल्याने त्यांनी घरातील आईचे कपाटात ठेवलेले दागिने पाहीले असता मला सोन्याचे दागिने, कॅश, घडयाळ व इतर वस्तु दिसुन आल्या नाहीत. त्यावर त्यांनी राकेश यास पुन्हा फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे राकेश सोनुने व त्याची पत्नी अश्विनी सोनुने यांनी विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी केल्याचे उघड झाल्याने राजेंद्र शेटे यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात या दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असुन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमित चव्हाण पुढील तपास करत आहेत.